Monday, March 26, 2012

'वेल आयुष्याची'

हिरव्या हिरव्या वेलीवरती
नाजूक एक पालवी फुटावी
लहान त्या फांदीवरती
नवजन्माची चाहूल लागावी

चिमुकल्या पानाला एक त्या  
नवी नवी ओळख मिळावी
मोठे होता वेलीला या
सुरेख अपुली ओळख द्यावी

अनेक अशा पानांनी या
वेल ती सुंदर खुलून यावी
डौलदार अपुल्या सुंदरतेने
सर्वांना आनंद ती द्यावी

काळाचे सर्वा बंधन असते
प्रत्येकाला मरण हे असते
खुललेल्या त्या हिरवळीतले  
पान शेवटी गळून पडते

वेल परंतु तशीच असते
नव्या पानांनी बहरून जाते
काही दिसांची कहाणी हि अपुली
अशीच आनंदी जगून घ्यावी

मधुरा खळतकर  

Thursday, March 22, 2012

'एकांत'

कधी हवा हवासा एकांत
कधी नको नकोसा एकांत
कधी जीव घेणारा एकांत
कधी गर्दीत जाणवे हा एकांत

विचारात गुंतवतो हा एकांत
कधी विचारशून्य असा एकांत
कधी विरहातला एकांत
कधी वेड लावे हा एकांत

कधी व्यसनाधीन करणारा एकांत
कधी नवकल्पना देणारा एकांत
सुप्त गुण उमलवणारा एकांत
दुःखात सुख गवसवणारा एकांत

पाहाल तसा दिसेल हा एकांत
मागाल ते देईल हा एकांत
सुखदुःखाचा मिलाप एकांत
एकांतात साथ देणारा एकांत



मधुरा खळतकर

Wednesday, March 21, 2012

'पाणीपुरी'









मित्रांचा जमे जिथे कट्टा
शाळा कॉलेजातून होता सुटका
गाठी भेटीची जी जागा ठरी
अशी असे ही पाणीपुरी

सोडून ऑफिसातील सारा रुबाब
मोठी मंडळी होई जिथे लहान
ठेल्यावरच जिची मजा निराळी
अशी असे ही पाणीपुरी

थोडी तिखट थोडी आंबट गोड
डोळ्यात पाणी तरी और एक प्लेट बोल
शेवटची पापडी अन् आठवे आईची बोलणी
अशी असे ही पाणीपुरी



मधुरा खळतकर

Friday, March 2, 2012

'Programming Code'

कोडयात टाकणारा हा programming code 
साधी सरळ वाक्ये सोडून भलताच झोल 

एक एक गोष्ट त्याला समजवावी लागते
आपलेच logic कधी कधी आपल्यावर चिडते
errors exceptions ची नांदी सुरु होते
काही केले तरी हे कोडे नाही सुटते

अथक परिश्रमांनंतर output हवे तसे दिसते
किती ओळींचा code हि क्षुल्लक बाब ठरते
optimization पासून तरी  नाही तुमची सुटका
efficiency नसेल तर code पडतो आडवा

शेवटी सगळे सावरून जेव्हा यश हाती पडते
केलेल्या परिश्रमांचे सार्थक झाल्याचे वाटते
न कळला कुणाला code तरी working सुरु असते
वाक्यं नसलेल्या ABCD वर आपलेच तेवढे प्रेम असते

मधुरा खळतकर