Thursday, April 26, 2012

'उन्हाळ्याची सुट्टी'

सुट्टी सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी
परीक्षा संपली, आली हक्काची सुट्टी

शाळा नाही अभ्यास नाही
उनाड उद्योग अन् दिवसभर मस्ती

कुठे उन्हाळी शिबीर कुठे सहल थंड गावी
खट्याळ भावंडांची साऱ्या जमेल गट्टी

आंब्याच्या रसाची असेल मेजवानी
रंगेल पत्यांचे डाव, नसेल गृहपाठाची धास्ती

येईल गप्पांना ऊत, आठवू जुन्या आठवणी
कुलरच्या हवेत ऐकू आजीच्या गोष्टी





मधुरा खळतकर

Tuesday, April 17, 2012

'इंद्रधनुष्य'

निसर्गाची किमया
ईश्वराची माया
कुणाचे हे सप्तरंग
दिसे सुंदर हे इंद्रधनुष्य

कुणा कवीची ही उपमा
कथेतील भाबडी कल्पना
कुणा चित्रकाराचे रंग
दिसे सुंदर हे इंद्रधनुष्य

विविध रंगांचे मिलन
एकाजुटिचा हा अविष्कार
देई आपणा संदेश
दिसे सुंदर हे इंद्रधनुष्य



मधुरा खळतकर

Saturday, April 7, 2012

'रानातील वाट'

शांत अशा प्रातःकाली
रानातील ती वाट असावी
अलगद थंडगार वाऱ्याची
शाल रानाने पांघरावी

हळू हळू सूर्याची किरणे
पाना आडून डोकवावी
रानातील त्या वाटेवरती
किरणांची चादर पसरावी

शांत शांत रानात त्या
पक्ष्यांची किलबिल व्हावी
ती तांबडी सूर्याची किरणे
हळू हळू पिवळी व्हावी

दिन हा माध्यान्हासी आला
सूर्य जरी तळपू लागला
घनदाट अशा त्या रानातूनी
शीतल अशी छाया मिळावी

सूर्य आता मावळतीला आला
पक्षी परते घरट्याकडे अपुल्या
पानांच्या आडूनी आता
चंद्राची ती कोर दिसावी

रानातील त्या वाटेवरती
तिमिराचे साम्राज्य पसरावे
रातकिड्यांच्या किरकिरण्यातही
रानाला आता निद्रा यावी



मधुरा खळतकर

Friday, April 6, 2012

'ब्रेकअप!!!'

सदैव सोबत राहण्याची शपथ घेतली होती
गीतेवर हात नाही पण मनाची साक्ष होती
काय झाले अचानक तुझी साथ सुटली
'कसे होणार!' अशी धास्ती माझ्या मनास लागली

सुचेना काही कळेना काही
विसरण्याची तुला माझी तयारी नाही
उपदेशांची यादी मित्रांनी वाचली
ज्ञान प्रदर्शनाची चांगली संधी साधली

म्हणाले, "ती गेली तर जा म्हणा उडत!"
"तुझ्यासोबत राहण्याची तिची लायकी नव्हती"
नानाप्रकारे माझी समजूत त्यांनी काढली
दिलेली सारी उदाहरणे मला खरी वाटली

मोठ्या ब्रेकअप पार्टीने खिशाची वाट लागली
खरंच तू नाहीस याची खात्री पटली
तुझीच एक मैत्रिण आता आवडायला लागली
तू दूर जाण्याची भिती ती माझी सरली



मधुरा खळतकर