Wednesday, June 20, 2012

'स्वप्नातील चिंब क्षण'

खिडकीबाहेर बघता बघता
गेले मी हरवून
मुसळधार पावसात जणू
गेले मी भिजून

पावसात या भिजली झाडे
फांदींना त्या बांधली झुले
चिंब चिंब मी भिजले होते
उंच उंच झोके घेत होते

तळे साचले हौद तुंबले
वाहत जाई कागदी नावे
नावेकडे त्या पाहत होते
नावेतून मी वाहत होते

पावसात आली तुझी आठवण
एक छत्री अन् दोघे आपण
हातात हात धरले होते
हळूच मी लाजत होते

नभातुनी या वीज चमकली
इंद्रधनूची कमान दिसली
ढगांचे जणू बनले घोडे
रथात बसुनी चाललो दोघे

जाऊ लागली अपुली स्वारी
सप्तरंगांच्या सुंदर गावी
नयनांचे पारणे फिटले
मनोमनी मी शहारले

बघता बघता पाऊस सरला
भान त्याचे नाही मजला
खिडकीतच मी बसले होते
स्वप्नातच मी भिजले होते

मधुरा खळतकर

No comments:

Post a Comment