Saturday, April 7, 2012

'रानातील वाट'

शांत अशा प्रातःकाली
रानातील ती वाट असावी
अलगद थंडगार वाऱ्याची
शाल रानाने पांघरावी

हळू हळू सूर्याची किरणे
पाना आडून डोकवावी
रानातील त्या वाटेवरती
किरणांची चादर पसरावी

शांत शांत रानात त्या
पक्ष्यांची किलबिल व्हावी
ती तांबडी सूर्याची किरणे
हळू हळू पिवळी व्हावी

दिन हा माध्यान्हासी आला
सूर्य जरी तळपू लागला
घनदाट अशा त्या रानातूनी
शीतल अशी छाया मिळावी

सूर्य आता मावळतीला आला
पक्षी परते घरट्याकडे अपुल्या
पानांच्या आडूनी आता
चंद्राची ती कोर दिसावी

रानातील त्या वाटेवरती
तिमिराचे साम्राज्य पसरावे
रातकिड्यांच्या किरकिरण्यातही
रानाला आता निद्रा यावी



मधुरा खळतकर

No comments:

Post a Comment